सुख सुख म्हणून माणूस धावला सुखामागं
त्यानं निसर्गापासून फ़ारकत घेतली
एक ’सुधारीत’ दुनिया उभी केली
पण ह्या दुनियेचं अंतिम सत्य काय,
तर माणसच्या जीवावर उठलेला माणूस
-दिलीपकुमार नाईक
अशाच एका दुनियेत राहणारी
आम्ही काही माणसं आहोत
पण ’निसर्गप्रेमी’ म्हणून जेव्हा आम्हाला संबोधले जाते
तेव्हा मिळणारा आनंद
"माणूस" ह्या एका शिवीने संबोधल्या जाण्य़ापेक्षा
खुप अधिक असतो..........
पृथ्वी आमची माता आहे
असं आभाळाएवढी छाती पुढे करुन सांगतो आम्ही
पण स्वत:च्या मातेवर होणारे बलात्कार पाहताना
आमचं रक्त पेटून न उठणारे षंढ आहोत आम्ही
तो बलात्कार पाहताना आम्ही काहीच करु शकत नाही
कारण तिचा पदर खेचण्यात
आमचेही हात नकळत गुंतलेले असतात
रोजच्या जीवनातील दंगलीतून
चार घटका शांती लाभावी म्हणून
आम्ही निसर्गाच्या कुशीत शिरतो
भटकतो...रिफ़्रेश होतो
पण परत त्या मानवी जीवनाच्या दंगलीचा भाग बनताना
त्या चार घटका मनात कुठंतरी ठेचल्या जातात
नाहीतर पहा कधी डोळे फ़ोडून ती वनराई
शांत दिसणा~या त्या वृक्षांमागून
एक रुदन ऐकू येत असतं
स्वरक्षणार्थ एक आक्रोश चाललेला असतो
आणि एरव्ही काव्यमय भासणा~या त्या पक्षांच्या कुजनात
दडलेला असतो एक आर्त स्वर
जो वरवर कितीही श्रवणीय आणि आल्हाददायी वाटत असला
तरी आतल्या आत पोखरत जात असतो
पण आम्ही आपले निसर्गकवी मात्र
त्यांना शब्दजडीत उपमांनी मढवून
आपली पोळी भाजून घेतो
पण ग्लोबल वॉर्मिंगचे चट्टे सहन करता करता
त्यांचा गळाही कधीतरी सुकून जाईल
आणि डरकाळ्या फ़ोडणारा तो वाघोबाही
आपलं अस्तित्व संपल्याची घोषणा देईल
तेव्हा आम्ही जागे होऊ
त्यांच्या नावे एक स्मारक बांधूव आपल्याही थडग्याची तयारी करू
Tuesday, April 1, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment