Wednesday, March 24, 2010

तुझ्या आठवणी....

(1)
तुझी पत्रं कोणाला सापडतील म्हणून
जेव्हा माळ्यावर जाऊन गुपचुप जाळून टाकली होती
तेव्हा काहीसा रडलोही होतो मी
आणि तूदेखील रागावली होतीस
आता इतक्या वर्षानंतर माळ्यावर
काही जळलेले कागद मिळाले आहेत
थोडे अजून ओलेच आहेत
थोडे अजून धुमसत आहेत!

(2)
मला कवितांचा नाद तूच लावलास
आणि ’गुलजार’चा फ़ोटो भेट म्हणून दिलास
तेव्हापासून त्या फ़ोटोतल्या गुलजारने
तुझ्या माझ्या सहवासातील प्रत्येक क्षणावर
लिहील्या आहेत कविता...
तुझ्या जाण्याने पण आता तोही एकाकी झालाय
काल पाहीलं तेव्हा ’हजार राहे मुड के देखी’
लिहीत होता वेडा!