Tuesday, March 22, 2011

वायफ़ळ बडबड

सुर्याला असा घाम वगैरे येतो का?
अन चंद्राला जागरणाचा त्रास वगैरे होतो का?
झाडाला सावली कोण देतं?
पंखांना उंचीची भीती वगैरे वाटत नाही का?
कोतवाल पक्ष्याची नक्कल कोण करतं?
झाडांच्या मुळांना अंग झटकावंसं वाटत नाही?
पाण्याल तहान लागते का?
मासे कशाला रडत नाही?
पृथ्वी भोवळ येऊन पडत कशाला नाही?

आणि असे असंख्य प्रश्न
जे गाडले होते ’वायफ़ळ बडबड’ म्हणून
माझ्या घरामागच्या शाळेवर बुलडोझर फ़िरविला
तेव्हा अचानक बाहेर आले!