Monday, November 5, 2012

माणसे

घेतल्या श्वासांपुरती इथे जगतात माणसे
हल्ली फ़ारच विचित्र वागतात माणसे

मी तिऱ्हाईताप्रमाणे बघत राहतो रांगा
कुठल्या मृगजळामागे धावतात माणसे?

सगळे चेहरे आता सारखेच वाटू लागले
कारकुनी मुखवटे रोज चढवतात माणसे

देवळाबाहेरच्या आंधळ्याकडे कोणी बघत नाही
देवळाआतल्या बहिऱ्याकडे गाऱ्हाणी घालतात माणसे

Thursday, November 1, 2012

उत्तर

प्रिय अमुक तमुक
मागे एका लांबलचक कवितेत
तू विचारलं होतंस माझी आठवण येते का इत्यादी वगैरे
उत्तर द्यायला मी काही कविता लिहीणार नाही
तुझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर खरं मलाही माहित नाही
तुझं नक्की कधी विस्मरण झालं ते आता आठवत आहे
सोबत ह्या पत्राच्या एक उशी पाठवत आहे
बहुतेक ह्या उशीत साठल्या आहेत तुझ्या आठवणी
ती जरा पिळून बघ निघतंय का खारट पाणी
त्या खाऱ्या पाण्याला तुझ्या आठवणीचं अत्तर आहे
त्या उशीतच गोठलेलं तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे

Monday, October 8, 2012

भीती वाटते हल्ली...


भीती वाटते हल्ली...
भीती वाटते जगण्याची आणि मरण येईल ह्याची
भीती वाटते आरशात स्वत:ला रोखून बघायची
भीती वाटते स्वत:ला सतत सिध्द करत राहण्याची
भीती गर्दीची, भीती एकटेपणाची
भीती वाटते रस्ता ओलांडताना, सिग्नलवर ब्रेक लावताना
भीती वाटते एटीएम आणि खिशातून पैसे काढताना
भीती वाटते देवाची, भीती उपवास तुटण्याची
भीती आजाराची, डॉक्टरांची, इंजेक्शन घेण्याची
भीती वाटते पुतळ्यात चिणून मारलेले महात्मे
परत जन्म घेतील आणि मांडतील नवे विचार
भीतीच वाटते नव्या विचारांची...
भीती वाटते कुणीतरी बसेल उपोषणाला
आणि बदलून टाकेल आपलं राजकिय आणि सामाजिक चित्र
भीती वाटते बदलाची...
भीती वाटते प्रश्न विचारायची, उत्तर द्यायची
भीती त्सुनामी,  भूकंप, वादळाची
भीती दंग्याची, हल्ल्याची, बॉम्बस्फ़ोटाची

भीती पसरत चाललीय
भीती सवय बनत चाललीय
निर्भीडपणे जगण्याची भीतीच वाटते हल्ली!

Wednesday, March 21, 2012

पुन्हा भेटू तेव्हा


आता पुन्हा भेटू तेव्हा
बोलू फ़ोनवर राहून गेलेलं
उभयतांच्या विरहात
डोळ्यातून वाहून गेलेलं

आता पुन्हा भेटू तेव्हा
उसास्यांचे हिशेब मांडू
कोणी ढाळले अश्रू जास्त
ह्याच मुद्दयावर भांडू

आता पुन्हा भेटू तेव्हा
एकमेकांना डोळे भरून पाहू
काही क्षणापुरतेच का होईना
घटट बिलगून राहू

आता पुन्हा भेटू तेव्हा
तू धरशील परत न जाण्याचा हटट
आणि भाबडे हात तुझे
मिठीही करतील अधिक घटट

आता पुन्हा भेटू तेव्हा
मागे काहीतरी ठेवून जा
पुढची भेट होईपर्यंत सख्या
रोज स्वप्नात येऊन जा......