Wednesday, June 10, 2015

माझ्या "ब्राम्हण" मैत्रिणीस

माझ्या "ब्राम्हण" मैत्रिणीस
तू स्त्री असूनदेखील शोषितांचं दु:ख समजू शकत नाहीस
ह्याचं आश्चर्य वाटतं सारखं
तुला स्वैपाकघरात कोंडून ठेवलेलं
मला जातीव्यवस्थेच्या तळाशी
परंपरेने ज्ञानर्जनाचे मार्ग ना तुला खुले होते ना मला
जानवं घालायचा अधिकार ना तुला न मला
मान वर करुन, डोळ्यास डोळा भिडवून बोलण्याचा अधिकार
ना तुला न मला
आपली पायरी ओळखून वागण्याचा जन्मजात मिळालेला शाप
तुझ्यामाझ्या शरिराचे विटाळही ठरलेलेच

इतकं सगळं असूनसुध्दा
"ब्राम्हणांनी तुमचं काय घोडं मारलंय रे?"
हे विचारताना तुझ्या लक्षात हे कसं येत नाही
कि घोडे पाळायचा आणि उधळायचा अधिकार
ह्या व्यवस्थेने तुला काय मला, सारखाच नाकारलाय

तू स्त्री असूनदेखील शोषितांचं दु:ख समजू शकत नाहीस
ह्याचं आश्चर्य वाटतं सारखं

-कौस्तुभ