Monday, August 31, 2009

आधीच कळलं होतं.....

भावनाशुन्य जगावं लागेल हे आधीच कळलं होतं
पुढची संकटं ओळखून आधीच पाऊल वळलं होतं

तुझ्या जाण्याने फ़ारसं दु:ख झालं नाही कदाचित
तुझं जाणं तुझ्याआधीच मला कळलं होतं

मनातल्या आठवणींचा वृक्ष हलला होता जरासा
पिवळं होण्याआधीच तुझं पान गळलं होतं

यार कसले जपले तेही उलटलेच शेवटी
मरण्याआधीच त्यांनी माझं सरण जाळलं होतं

कुठल्याही कंपूत मला सामील केले नाही
येण्याआधीच माझं त्यांनी नाव गाळलं होतं

Saturday, August 29, 2009

हल्ली माझ्या नकळत

पेनातून हल्ली
माझ्या नकळत
मनात दडवलेल्या गोष्टी
अलगद कागदावर उतरतात
मी तिऱ्हाईताप्रमाणे बघत राहतो
माझ्याच मन, पेन व हातानी
माझ्याविरुध्द चालविलेले हे डाव
आणि टेबलावर वाढत जाणारे
कवितांचे बाड!

Tuesday, August 11, 2009

काल भर चौकात

काल भर चौकात एका म्हाताऱ्यामागे
एक पिसाळलेला कुत्रा लागला
म्हातारा पळू लागला जिवाच्या आकांताने
पाहत होता बाजार सगळा
एवढ्यात कुठून कोण जाणे
एक काळं टि-शर्ट घातलेल्या माणसाने
झाडली कुत्र्यावर एक गोळी
कुत्रा तिथेच गतप्राण झाला
फ़ोडून एक किंकाळी
भेदरलेल्या म्हाताऱ्याभोवती
एव्हाना घोळका सारा जमला
त्या इसमाच्या नावानेही
जयघोष सुरु झाला
कोणी म्हणालं
त्या हिंदू माणासनं म्हाताऱ्याचा जीव वाचवला
तो म्हणाला "मी हिंदू नाही!"
आणखी कोणी म्हणालं
त्या मुस्लिम माणासनं म्हाताऱ्याचा जीव वाचवला
तो म्हणाला "मी मुस्लिम नाही!"
आणखी कोणीतरी बोलला की
त्या ख्रिस्ती माणासनं म्हाताऱ्याचा जीव वाचवला
तो म्हणाला "मी ख्रिस्ती नाही!"
ह्यावर त्याला लोकांनी विचारलं
’तु कोण आहेस?’
तो म्हणाला मी काही देव-धर्म मानत नाही
मी एक नास्तिक आहे
हे ऐकताच कोणीतरी ओरडलं
त्या हिंसक नास्तिकाने
एका कुत्र्याचा बळी घेतला
ठेचा त्याला!"

काल भर चौकत एका नास्तिकामागे
एक पिसाळलेला समाज लागला!

झाली सांज एकाकी

झाली सांज एकाकी
कोणी वाजवेना पावा
सूर हरपल्या मनी
कृष्ण दाटून का यावा?

का रंग मावळतीचे
आज काळॊखी बुडाले
का पंख परतीचे
आज नाही ऊडाले
काजळता संध्याकाळ
वाहे उदासीन हवा

अवघडलेला चंद्र
चांदणीही बुजलेली
अवेळीच्या काळोखाने
रातराणी कोमेजलेली
झुळूक हळवी येताच
उर का भरावा?

पिसे होई मन
धावे दिशाहीन
वाट चाले आंधळी
क्षितिजात होता लीन
सैरभैर धरणीला
कंप का फ़ुटावा?