Monday, November 5, 2012

माणसे

घेतल्या श्वासांपुरती इथे जगतात माणसे
हल्ली फ़ारच विचित्र वागतात माणसे

मी तिऱ्हाईताप्रमाणे बघत राहतो रांगा
कुठल्या मृगजळामागे धावतात माणसे?

सगळे चेहरे आता सारखेच वाटू लागले
कारकुनी मुखवटे रोज चढवतात माणसे

देवळाबाहेरच्या आंधळ्याकडे कोणी बघत नाही
देवळाआतल्या बहिऱ्याकडे गाऱ्हाणी घालतात माणसे

Thursday, November 1, 2012

उत्तर

प्रिय अमुक तमुक
मागे एका लांबलचक कवितेत
तू विचारलं होतंस माझी आठवण येते का इत्यादी वगैरे
उत्तर द्यायला मी काही कविता लिहीणार नाही
तुझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर खरं मलाही माहित नाही
तुझं नक्की कधी विस्मरण झालं ते आता आठवत आहे
सोबत ह्या पत्राच्या एक उशी पाठवत आहे
बहुतेक ह्या उशीत साठल्या आहेत तुझ्या आठवणी
ती जरा पिळून बघ निघतंय का खारट पाणी
त्या खाऱ्या पाण्याला तुझ्या आठवणीचं अत्तर आहे
त्या उशीतच गोठलेलं तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे