Saturday, December 10, 2011

क्लिक्स!


माझ्या होस्टेलच्या मेसमध्ये एक भलामोठा फ़लक आहे. त्यावर लिहिलंय की "अन्नाची नासाडी करू नये कारण भारतात ६३ टक्के मुलं उपाशी झोपतात. त्याच मेसमध्ये किशन नावाचा एक गोंडस पोरगा काम करतो. तो स्वत: शाळेत नाही जात पण आमच्यासारख्या लोकांच्य़ा पिण्याच्य़ा पाण्य़ाची व्यवस्था करतो. तो आमची तहान भागवतो पण त्याच्या शिक्षणाची तहान कोण भागवणार? मेसवाले तिथं निरक्षरतेचं प्रमाण सांगणारा एखादा फ़लक का नाही लावत?
---------------------------------------------*************---------------------------------------------------------------------
एका अनपेक्षित सायंकाळी मुंबई परत एकदा हादरली स्फ़ोटांनी! मीही घरबसल्या हादरलोच कि...लगेच सगळ्या मित्र नातेवाईकांना फ़ोन केला आणि सुस्कारा देत आईला म्हणालो, "आपले सगळे ठिक आहेत. काळजी नको!"
तेव्हा स्वत:चीच घृणा वाटली मला...आपले म्हणजे नक्की कोण? आणि जे आपले नाहीत त्यांचं काय? जे जखमी झाले, मेले त्यांचं काय? सगळ्यांचाच ठोका चुकला पण दुसऱ्यादिवशी मुंबईकर सकाळची लोकल पकडायला विसरला नाही. मुंबईकरांच्यास्पिरीटचं कौतुक वगैरे झालं आणि मी पण आपल्या कामात मग्न झालो...आपण नक्की काय बनत चाललो आहोत? खंबीर? का बोथट?
---------------------------------------------*************---------------------------------------------------------------------
बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. भल्या पहाटे पुण्यात पोहोचलो होतो. बस सिग्नलपाशी थांबली होती. सिग्नलजवळच्या फ़ुटपाथवर एक भिकारी काही लाकडं पेटवून फ़ाटक्या कपड्यातलं अंग शेकत होता. त्याच्या डाव्या पायावर एक जखम, किंचित उजाडलेल्या पहाटेतसुध्दा ठळक दिसत होती. अचानक तो पाय झटकून ओरडू लागला. त्या जखमेवर कोळसा पडून ती पेटू लागली होती. पण सभोवतालच्या गर्दीतून चालणाऱ्या कोणीच त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. तो एकटाच असहाय्यपणे पाय झटकत, व्हिवळत राहिला. बस निघून गेली आणि मीही...असहाय्यपणे!
आता वरचेवर पुण्यात येतो तेव्हा बॅगमध्ये मलम असतंच...त्या सिग्नलपाशी गाडी थांबल्यावर मी शोधतो त्याला....तिथे फ़क्त राख दिसते धुमसणारी!
---------------------------------------------*************---------------------------------------------------------------------
एकदा आईबाबांबरोबर बसने औरंगाबादला चाललो होतो तेव्हाची गोष्ट. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दूरवर पसरलेली पडीक शेतजमीन होती...अचानक नजर गेली त्या जमिनीपुढे ठिपक्याएवढ्या दिसणाऱ्या दोन जीवांकडं...एक आई आपल्या छोट्या पोराचं बोट धरुन त्या पडक्या शेतातून जात होती. सुर्य डोक्यावर आला होता. मला दूर बसमधूनसुध्दा तिच्या चालण्यातला थकवा जाणवला. तिची चाल रेंगाळली पण ते पोर तिचा हात सोडून पुढे चालत राहिलं. ती माउली चार-पाच पाउलं पुढं चालली मात्र, भोवळ येऊन तिथंच बेशुध्द पडली! ते पोर मात्र आपल्या धुंदीत चाललं होतं आणि त्याची आई मागं… बेशुध्द पडलेली....मला ओरडावसं वाटलं पण जमलं नाही. पटकन मागं वळून बघितलं तेव्हा आई बाबांच्या खांद्यावर डोकं टेकवून झोपली होती. त्या कोवळ्या वयात पहिल्यांदाच मला माझ्या नशिबाची लाज वाटली असेल...
---------------------------------------------*************---------------------------------------------------------------------
परवा सकाळी खुशीत होतो..बाबांनी डेबिट कार्डवर पैसे टाकले होते. त्यादिवशी खरेदी केली, पिक्चर पण पाहिला आणि एक मस्त पिझ्झा पण हाणला. संध्याकाळी चौकात डोंबाऱ्याचा खेळ पहायला मिळाला. एक माणूस दोरीवरून चालण्याची कसरत करत होता तर त्याचा मुलगा खाली ढोल बडवत नाचत होता. खेळ संपला, गर्दी पांगली पण माझ्या सामाजिकदृष्ट्या जागरुक वगैरे असलेल्या स्वभावाला राहावलं नाही म्हणून त्या मुलाजवळ गेलो आणि विचारलं "काय मित्रा, शाळेत जातोस का नाही?"
तो नाही म्हणाला. कारण विचारल्यावर कळलं कि वडील दम्याने आजारी असतात. अश्या अवस्थेतही ते हे खेळ करून कसंबसं आपलं घर चालवतात. "जिथे दोन वेळचं जेवण परवडत नाही तिथं शाळेची चैन कुठून परवडणार दादा?" बाप म्हणाला. माझ्याकडे उत्तर तयार होतं पण देऊ शकलो नाही. त्या मळकटलेल्या कोमल हातांनी एक सणकन मुस्काटीत मारल्यासारखं झालं मला..तो बाप त्याला इतक्यात घेऊन पण गेला. मी तिथंच थिजलो. बाबांना त्याचक्षणी कित्ती फ़ोन ट्राय केले...बाबा मिटींगमध्ये होते आणि माझ्या खिशात पैसे संपत आलेलं डेबिट कार्ड होतं!
---------------------------------------------*************---------------------------------------------------------------------
ह्या सगळ्या घटनांमध्ये साम्य काहीच नव्हतं पण सगळ्या तितक्याच तीव्रतेने मनावर कोरल्या गेल्या आहेत. प्रसंग वेगवेगळे, स्थळ-काळ वेगळे पण अनुभवलेली अस्वस्थता तितक्याच तोडीची. आपण सर्व अश्या घटनांचे साक्षीदार बनतो पण त्यांचे विविध कंगोरे उलगडून कधी बघितलं तर स्वत:च्या आयुष्याबद्दलचा एक नवा दृष्टिकोन मिळतो. अश्या घटना आपल्या नकळत आयुष्याबद्दलच्या जाणीवा स्पष्ट करुन देतात. आपण किंचीतसे बदलेलो असतो.
घरची आणि आईची मिठी सोडवून आता होस्टेलवर राहतो. आई नसते काळजी करायला आणि लाड पुरवायला पण औरंगाबदेतला तो प्रसंग आठवला की माझं दु: शुन्य वाटतं त्या तान्हुल्यापुढे!
दिवाळीच्या खरेदीसाठी बाबांनी ह्यावेळी डेबिट कार्डवर जरा जास्तच पैसे टाकले. मेसमधला किशन दिवाळीसाठी राजस्थानला आपल्या गावी चालला होता. ह्यावेळी स्वत:पुरती चैन करता आम्ही सर्व होस्टेलवरच्या मित्रांनी त्याच्यासाठी कपडे आणि मदत म्हणून काही पैसे त्याला दिले. त्याला सोडायला पुणे स्टेशनवर देखील गेलो होतो आम्ही. प्लॅटफ़ॉर्मवर एक म्हातारा भिकारी दिसला...पायावर काळपट जळल्याचे डाग होते. बहुधा तो त्या सिग्नलवरचा....तोच असावा कदाचित!
---------------------------------------------**********************-----------------------------------