माझ्या विझण्याचा सोहळा
इथल्या चांदण्यांनाही होता माझ्या हसण्याचा लळा रात्र होण्याआधी संपवा माझ्या विझण्याचा सोहळा पाठ फिरवून जगाकडे मी घ्यायला निघालो समाधी कित्येक सरसावले पुढे मागून कापण्या गळा सावलीत पहुडल्या आश्रिताला काय सांगू माझी व्यथा मातीत रुजण्याचे शाप अन सूर्य सोसण्याच्या झळा माझ्या बदनामीचे का आहे येथे वावडे कुणाला? कोणी करावीच बातमी तर काय लिहावा मथळा? जगण्याच्या इच्छेविरुद्ध मी भरतो जीवघेणे उसासे मी निमंत्रले आहे मरण श्वास करण्या मोकळा - कौस्तुभ