आता माझ्या साऱ्या गोष्टी
तुझ्यापाशी येऊन थांबतात
वाहणारे वारेही हल्ली
तुझीच कहाणी सांगतात
तुझ्या डोळ्यात खोलवर
झोप माझी विरलेली
तुझी माझी स्वप्नभेट
रोज रात्री ठरलेली
स्वप्नातल्या त्या गप्पांसोबत
रात्रीही हल्ली लांबतात
खिडकीतून झिरपणारी किरणे
अंगावर येताना वाटते असावा तुझाच हात
डोळे उघडल्यावर पण कळते सारे खरे
मिठीतल्या उशीनेही केलेला असतो घात
किरणे काय, उशी काय
सारे तुझेच अस्तित्व सांगतात
तु सांडलेल्या मोगऱ्याच्या गंधाचा
मी करत राहतो पाठलाग
कळ्याही वाटेवरच्या अवचित येतात खुलून
तुझा श्वास दरवळतो बनून पराग
चालता चालता शेवटी तुझ्या मिठीत येऊन पोहोचतो
आणि पुढचे सारे रस्ते संपलेले असतात
1 comment:
superb !!
Post a Comment