Friday, June 17, 2016

जाऊदेत...

आपण दोघं जर
दोन वर्षांपूर्वी
किंवा पाच वर्षांनंतर भेटलो असतो
तर सगळं जुळूनही आलं असतं कदाचित
तू माझी नखं रंगवली असतीस
मी तुझ्या पाठीवर
कविता गोंदल्या असत्या

जाऊदेत...
अश्या क्षणी
नशीबाला दूषण देण्यापेक्षा
एका अशाश्वत प्रेमाचं
अधुरं वचन देशील?

Sunday, June 5, 2016

उत्कट

तुला तुझ्या आवेगासकट
कवेत घेताना
मला माझ्या अपूरेपणाचा अंदाज
येत राहतो
कसं जमतं तुला
सतत एवढं उत्कट राहणं?

Thursday, June 2, 2016

किंवा कसंही...

चल ना डेटवर जाऊ 
डिनर करु दारु पिऊ
your place or mine ते ठरवत
मेक आउट करु
अशी जन्मांची ओळख वगैरे नसताना
घट्ट बिलगून झोपू
क्षणिक सहवासाचं थ्रिल आणि reassurance 
एका तपाच्या कमिटेड रेलशनशिपपेक्षा अधिक वाटेल
असं काहीतरी करु
सकाळी उठून awkward स्माइल्स एक्सचेंज करु
मिठी सोडवू
खाली जाऊन ब्रेकफास्ट/ब्रंच करु
बिल येइपर्यंत शांत राहू
मी ओला कॅब  मागवीन
तू त्यात बसून घरी जा
जाताना गुडबाय hug
फोरहेडवर किस दे
पब्लिक प्लेस असल्याने
स्मूच टाळू
कॅब  ज़रा पुढे गेल्यावर
'चलो एक बार फिर से'ची यूट्यूब लिंक
तू मला व्हाट्सएप्पवर पाठव
मी 'I love साहीर' असं रिप्लाय करीन
मानेवर उठलेली हिकी फेड होईपर्यंत
आपण शक्यतो बोलूया नको
किंवा कसंही...

Sunday, April 24, 2016

देशभक्तिपर...

(1)

ऑफशोर कंपन्यांच्या डेस्कवर बसून
व्हॅलीची स्वप्नं रंगवीणाऱ्या
नीओलिबरलीझमच्या भडव्यांकडून
देशभक्तिपर प्रवचने ऐकायला
क्यूट वाटतं

(2)

पुण्यात 'आईची जय' हि शिवी आहे
आणि 'भारत माता कि जय'
हि देशभक्तिपर आरोळी आहे

ह्यातला फरक आणि साम्य
जेव्हा लक्षात येईल
तेव्हा दोन्ही उच्चारणे बंद करावी
कळावे
लोभ असावा

Sunday, October 5, 2014

कश्मीर

काही रिकामी घरं
काही ओसाड गाव
एक दरी रोज पेट घेते
कश्मीर तिचं नाव

दऱ्यांत घुमतो आक्रोश
बर्फ़ात साकळताना रक्त
बंदूका ग्रेनेड धडाडू लागतात
आपण बातम्या पाहतो फ़क्त

कुणाचे राजकीय चोचले
कुणाचे राष्ट्रवादी अहंकार
झेलमच्या गर्भात उठलेला
कधी थांबेल हा संहार?

हातात मुलाचा फ़ोटो
चेहऱ्यावर हरवलेला भाव
एक आई दररोज घेउ पाहतेय
हरवलेल्या अर्भकांचा ठाव

बॅचलर्स

घरभर पसरलेला सिगरेटचा वास
हॉलमध्ये वाटीत पाणी घालून बनवलेले ऍश ट्रे
ओल्ड मॉंक किंगफ़िशर इत्यादी वगैरेच्या बाटल्या
सोफ़्याच्या फ़टीत रुतलेलं फ़रसाण
तंदूरीची हाडं
प्लेटवर सुकलेली ग्रेव्ही
त्यात चरणारी झुरळं
कवितांची काही पानं
पलाशचं "माएरी" आणि पियूषचं "हुस्ना"
आपल्या तारांवर प्रसवत कोपऱ्यात पडलेलं गिटार
रुममध्ये आडवे पडलेले बॅचलर्स
रुटीनच्या नाकावर टीच्चून
जागवलेली एक रात्र.....

Monday, July 14, 2014

पॅलेस्टाईन

तिथे निरागसतेचा खून चाललाय
इथे त्या रक्तसंहाराचं समर्थन चालू आहे
निष्पाप जीवांच्या मरणावर टाळ्या पिटणारी येडझवी मानसिकता
कुठल्या जिहादापेक्षा कमी नाही
आपलं आयुष्य पोकळ म्हणून
दुसऱ्यांच्या दु:खात सण शोधणाऱ्यांना
जेव्हा आपल्या गांडीखाली पेटलेल्या सुरुंगाची चाहूल लागेल
तेव्हा दुसऱ्या बाजूला पॉपकॉर्न घेऊन तुमचंही मरण एन्जॉय केलं जाईल
आणि तुम्हाला मारणारे किंवा मरु देणारे लोक तेच असतील
ज्यांचा आजपर्यंत तुम्ही उदो उदो करत आला आहात
तोपर्यंत चालू राहू द्या तुमचे अखंड राष्ट्रांचे जिहाद
आणि मध्यमवर्गीय कोशातलं कुजकं जगणं
कारण इतिहासापासून धडे घेतले नाहीत
तर तो परत जगण्याचा शाप इथे प्रत्येकाला मिळालेला आहे