Wednesday, February 13, 2008

Valentine Day Special....चारोळ्या....

हल्ली स्वप्नात रोज
तुझीच चाहूल लागते
स्वप्न पाहण्यासाठी मग
रात्रही माझ्यासोबत जागते

हल्ली तू समोर दिसलीस की
नजर लगेच दुसरीकडे वळते
मनात चाललेली धाकधूक
डोळ्यांनाही बरोबर कळते

तुझ्याशी बोलून आल्यावर
मी मनाशी हसत राहतो
तू विणलेल्या शब्दांच्या जाळ्यात
रात्रभर फ़सत राहतो

काय असेल ती रात्र
जिला जोडलेली नसेल पहाट
लखलखणा~या चांदण्यावर मग
सूर्यही जळेल अफ़ाट

Saturday, January 12, 2008

मुखवटा

“आणखी नाही जमणार मला
असं मुखवटा घालून जगणं
खोट्या तत्वांशी सांगड घालून
स्वत:कडेच चोरून बघणं”

Saturday, January 5, 2008

तू भेटतोस अजूनही
शब्द रखडून टाकलेल्या
कागदातून जिवंत हो‌ऊन
तू माझ्याशी बोलतोस
तू सोडलेल्या श्वासातूनच
तू घेतोस जन्म
आणि एरव्ही तुझ्याबरोबर मरून गेलेल्या भिंती
धडधडत्या ह्रुदयाने पेटून ऊठतात आजव्या दिवशी
मी मात्र स्तब्ध बसून असतो
तुझा पुनर्जन्म अनुभवत
आणि मग मी ग्लास भरतो
फ़ेसाळलेली बी‌अर रिचवल्यानंतर
तुला माझ्यात भिनवत राहतो
तुला माझ्यात जीवंत करतो
परत भेटशील का आता?
वेळेचं बंधन पाळलं नाही तरी चालेल
कारण उशीरा येण्याच्या कारणावरून
भांडण्यात काही अर्थ उरला नाही आता

तुला खुप काही सांगायचं होतं
पण डोळ्यातून कधीचंच वाहून गेलंय ते
परत कडा ओल्या करणं
कदाचित जमणार नाही आता

एकाच छ्त्रीत राहून
अर्धंअर्धं भिजणं डोळ्यासमोर आलं
कि मन चिंब हो‌ऊन जायचं
पण ती छ्त्री वा~याबरोबर उडून गेलीय आता

आठवतं तुला?
एकदा चिमणा-चिमणीला घरटं
बांधताना पाहीलं होतं आपण
त्या घरटय़ामध्ये एक भिंत तयार झालीय आता

Monday, December 31, 2007

वर्ष सरलं तरी!




वर्ष सरलं तरी,
जखमा भरल्या नाहीत
नव्या जखमांना शरिरावर
जागाही उरली नाही
अश्रू आटून गेले
आता भावनाही संपल्या
तरीही का ह्या वेदना
मनात आहे गुंफ़ल्या?
व्यवहारी झालोय मी आता
व्यवहारी जीवन जगतोय
मनातल्या आठवणींचा कप्पा
क्वचितच उघडून बघतोय
का ह बदल माझ्यात?
क बदललंय सगळच वातावरण
धुमसत का राहतं अजूनही
पेटलेल्या मनाचं सरण
नवी पहाट दूर करेल हा काळोख?
का वाढत जाईल हा काळोख?
नाही!
प्रकाशाच्या शक्तिने काळोखी भींतीला
पडेल एक खिंडार...
कोंडलेल्या श्वासाला मिळावे
आता सुस्कारे आकाशाचे
मनाला लाभावे नवचैतन्य
सळसळण~या रक्ताचे
सतारीवर छेडावे आता
स्वर नव्या भूपाळीचे
चिकारीही झंकारत याव्या
घेऊन स्वरगालिचे
विदीर्ण झालेल्या मनाला
फ़ुटावी पालवी नवी
सरत्या वर्षाने गावी
ह्या आसवांची भैरवी

Monday, December 3, 2007

काही चारोळ्या.....

माझं विष आता
मलाच डसू लागलंय
गारुड्याच्या पुंगीलाही
आता जग फ़सू लागलंय

अडखळणारा श्वास हा
आहे स्वतःशीच थांबलेला
अश्रूंनी भिजूनसुध्दा
आत कुठेतरी पेटलेला

तुझ्या आठवणींचे निखारे
धुमसत आहे अजूनही
पूर्णपणे विझलेले नाहीत
शुष्क आसवांत भिजूनही

Tuesday, November 13, 2007

तुझी पुसटशी आठवण
अश्रुंचा बांध तोडून जाते
खोलवर दडपून ठेवलेल्या भावना
रक्तात पेट घ्यायला लागतात
रेशमी धाग्यांनी शिवलेली जखम
पुन्हा एकदा उसवली जाते
आणि वाहत्या रक्तावर कोणाचाच ताबा उरत नाही
सहन होत नसलेल्या वेदनांचे वादळ झेलत
सभोवताली माजलेल्या कोलाहलात
एका गडप अंधारी विश्वात
तुझ्या आर्त स्वरांचा ठाव घेत
मी तारा तुटलेली सतार छेडत असतो

कौस्तुभ……