Sunday, May 8, 2011

जगणे हरवले होते

श्वास होते चालू, जगणे हरवले होते
देशाचे ह्या भाग्य, कोणी फ़िरवले होते?

कोण कुठले प्रेषित, एकजात भोंदू सारे
अजाणता आम्ही कोणाला, देव ठरवले होते

उभा देश झाला जखमी, रक्त धर्माचे वाहले
कुठल्या स्वातंत्र्याचे झेंडे, तेव्हा मिरवले होते?

सुताने गाठता येतो स्वर्ग सिध्द होते झाले
जेव्हा त्या महात्म्याने एक चाक फ़िरवले होते

स्वप्ने सोनेरी होती तेव्हा डोळ्यात आस होती
काय झाले आमचे आज, काय ठरवले होते?

Tuesday, March 22, 2011

वायफ़ळ बडबड

सुर्याला असा घाम वगैरे येतो का?
अन चंद्राला जागरणाचा त्रास वगैरे होतो का?
झाडाला सावली कोण देतं?
पंखांना उंचीची भीती वगैरे वाटत नाही का?
कोतवाल पक्ष्याची नक्कल कोण करतं?
झाडांच्या मुळांना अंग झटकावंसं वाटत नाही?
पाण्याल तहान लागते का?
मासे कशाला रडत नाही?
पृथ्वी भोवळ येऊन पडत कशाला नाही?

आणि असे असंख्य प्रश्न
जे गाडले होते ’वायफ़ळ बडबड’ म्हणून
माझ्या घरामागच्या शाळेवर बुलडोझर फ़िरविला
तेव्हा अचानक बाहेर आले!

Thursday, October 7, 2010

ते दिवस

ते मंतरलेले दिवस, विसरू कसे?

कुणी सांगाल का, ते दिवस परत जगू कसे?


ते कट्ट्यावरचे किस्से अन लेक्चरचे उसासे

ते भजी अन सामोसे, विसरू कसे?

ती कॅम्पसमधली टपरी, त्या F.Y.च्या पोरी

ते थॅंक्यू ते सॉरी विसरू कसे?

अरे तिला हटव उद्या हिला पटव

परवाची कोण रे ती, तिचं नाव जरा आठव

देता कोणी थम्स अप, सालं हार्ट आमचं चोक अप

दिवसा हजार ब्रेक अप, पचवू कसे?

क्लासमध्ये आपला धाक, ठरलेला शेवटचा बाक

बसलाच दुसरा कुणी, त्याला दिली चपराक

पहिल्या बाकावरची मंडळी, साली पत्रकार सगळी

खरडती वह्यांच्या पत्रावळी, किडे कसे….

वर्गातल्या काकू, सरस्वतीचा अवतार

परीक्षेत उपकार, मानू कसे?

विसरलेली थिअरी, गोंधळलेली केमिस्ट्री

पेपर साला मिस्ट्री, लिहू कसे?

हाती येता निकाल, जाहला उष:काल

फ़र्स्ट क्लासात पास, झालो कसे?

निकालाचा सरता जोश, आला थोडा होश

कॉलेजचे दिवस, सरले कसे?

पाऊल निघता निघेना, आसवे थांबता थांबेना

कॅम्पसशी ह्या नाते, तोडू कसे?

Thursday, April 1, 2010

पावले जपून टाक

पावले जपून टाक, रात वेडी आहे
चंद्रावरची वाट आज नागमोडी आहे

इथल्या पिसवांनी घेतले, बळी हजार निष्पापांचे
तुझ्याही रक्ताला आज, तीच गोडी आहे

नव्हते कधीच ऎकलेले आवाज हे कोणाचे?
ह्या गगनभेदी किंकाळ्यांचा थाट तोडी आहे

Wednesday, March 24, 2010

तुझ्या आठवणी....

(1)
तुझी पत्रं कोणाला सापडतील म्हणून
जेव्हा माळ्यावर जाऊन गुपचुप जाळून टाकली होती
तेव्हा काहीसा रडलोही होतो मी
आणि तूदेखील रागावली होतीस
आता इतक्या वर्षानंतर माळ्यावर
काही जळलेले कागद मिळाले आहेत
थोडे अजून ओलेच आहेत
थोडे अजून धुमसत आहेत!

(2)
मला कवितांचा नाद तूच लावलास
आणि ’गुलजार’चा फ़ोटो भेट म्हणून दिलास
तेव्हापासून त्या फ़ोटोतल्या गुलजारने
तुझ्या माझ्या सहवासातील प्रत्येक क्षणावर
लिहील्या आहेत कविता...
तुझ्या जाण्याने पण आता तोही एकाकी झालाय
काल पाहीलं तेव्हा ’हजार राहे मुड के देखी’
लिहीत होता वेडा!

Saturday, October 10, 2009

आता माझ्या साऱ्या गोष्टी

आता माझ्या साऱ्या गोष्टी
तुझ्यापाशी येऊन थांबतात
वाहणारे वारेही हल्ली
तुझीच कहाणी सांगतात

तुझ्या डोळ्यात खोलवर
झोप माझी विरलेली
तुझी माझी स्वप्नभेट
रोज रात्री ठरलेली
स्वप्नातल्या त्या गप्पांसोबत
रात्रीही हल्ली लांबतात

खिडकीतून झिरपणारी किरणे
अंगावर येताना वाटते असावा तुझाच हात
डोळे उघडल्यावर पण कळते सारे खरे
मिठीतल्या उशीनेही केलेला असतो घात
किरणे काय, उशी काय
सारे तुझेच अस्तित्व सांगतात

तु सांडलेल्या मोगऱ्याच्या गंधाचा
मी करत राहतो पाठलाग
कळ्याही वाटेवरच्या अवचित येतात खुलून
तुझा श्वास दरवळतो बनून पराग
चालता चालता शेवटी तुझ्या मिठीत येऊन पोहोचतो
आणि पुढचे सारे रस्ते संपलेले असतात

Wednesday, October 7, 2009

हसण्याचेही आताशा मी

हसण्याचेही आताशा मी कर्ज काढलेले
जगण्यासाठी श्वास थोडे उसने घेतलेले

शत्रूंच्या शोधात काल निघालो मी जेव्हा
मित्र माझे नेमके वाटेत भेटलेले

मनात धुंडाळता अलगद आठवणींचे कप्पे
तिच्या नावाखाली काही अश्रू सांडलेले

आयुष्यभर शोधिली मी माझ्या जगण्याची कारणे
उत्तर शेवटी मिळाले मरणाशी सांधलेले

नकोच होते एवढे तरी मागून घेतले मी
हवे होते मात्र जे न घेताच राहीले