Sunday, October 5, 2014

कश्मीर

काही रिकामी घरं
काही ओसाड गाव
एक दरी रोज पेट घेते
कश्मीर तिचं नाव

दऱ्यांत घुमतो आक्रोश
बर्फ़ात साकळताना रक्त
बंदूका ग्रेनेड धडाडू लागतात
आपण बातम्या पाहतो फ़क्त

कुणाचे राजकीय चोचले
कुणाचे राष्ट्रवादी अहंकार
झेलमच्या गर्भात उठलेला
कधी थांबेल हा संहार?

हातात मुलाचा फ़ोटो
चेहऱ्यावर हरवलेला भाव
एक आई दररोज घेउ पाहतेय
हरवलेल्या अर्भकांचा ठाव

बॅचलर्स

घरभर पसरलेला सिगरेटचा वास
हॉलमध्ये वाटीत पाणी घालून बनवलेले ऍश ट्रे
ओल्ड मॉंक किंगफ़िशर इत्यादी वगैरेच्या बाटल्या
सोफ़्याच्या फ़टीत रुतलेलं फ़रसाण
तंदूरीची हाडं
प्लेटवर सुकलेली ग्रेव्ही
त्यात चरणारी झुरळं
कवितांची काही पानं
पलाशचं "माएरी" आणि पियूषचं "हुस्ना"
आपल्या तारांवर प्रसवत कोपऱ्यात पडलेलं गिटार
रुममध्ये आडवे पडलेले बॅचलर्स
रुटीनच्या नाकावर टीच्चून
जागवलेली एक रात्र.....