Sunday, August 4, 2013

मनाची कवने

लिहून काढ । मनाची कवने ।
शब्द उसने । घेवोनिया ॥

स्वत:ची दांभिकता । कर मान्य ।
होशील असामान्य । त्याच क्षणी ॥

भरतात सारे । जगण्याचे अर्ज ।
श्वासांचे कर्ज । काढोनिया ॥

नको वाहू । अपेक्षांचे ओझे ।
स्वप्न तुझे । जग आता ॥

स्वत:पुरते जगणे । म्हणजे स्वार्थ ।
हा अन्वयार्थ । जाणून घे ॥

कोणी काहीही । म्हणून ठेवले ।
सगळे त्यातले । खरे नसते ॥

तुझ्या क्रुसाचा । तुझ्यावरच भार ।
जगाला मार । फ़ाट्यावर ॥

Thursday, July 25, 2013

काहीतरी लिही

तू बरेच दिवस काही लिहीलं नाहीयेस
कविता, चारोळ्या, लेक्चरच्या नोट्स
काही काही नाही
आणि प्लीज फ़ेसबुक स्टेटस सोडून काहीतरी दुसरं वाच
गुगल रीडर बंद झालंय
ह्या दुख्खात राहून काहीही उपयोग नाही
तुझी सर्जनशीलता, वैचारिक प्रगल्भता वगैरे
मांड ना लोकांपुढे..
मागच्या टुकार कवितेपेक्षा हि बरी होती हे तरी समाधान मिळेल
टाक फ़ेसबुकवर
तिथं डिसलाईकचा पर्याय नसतो लोकांना
आणि जगात असं वाईट वगैरे काही नसतं रे
बाहेर पाऊस वगैरे पडतोय (पुण्यातला झाला तरी शेवटी पाऊसच ना?)
लिही चार पाच कविता
धरणीने हिर्वा शालू पांघर्ला वगैरे
लिही रे काहीतरी
तुला नक्की कशाचा त्रास होतोय?
मिडीयामुळे होणारं ट्रिवियलाझेशन?
मोदी, राहुल, खैरलांजी, ऍसिडिटी? सांग ना..
लिही ना तू तसं
प्लीज काहीतरी लिही..

कविता न सुचण्याच्या मृतावस्थेवर
अग्दी असं आंग्लाळलेल्या जोडाक्षरी मराठीत
नवं आणलेलं पेन हरविण्याआधी
काहीतरी लिही

Thursday, December 20, 2012

मराठी गोव्याची राज्यभाषा कि मातृभाषा?
वरील स्टेटस वाचून हसू का रडू तेच कळाले नाही. माध्यमप्रश्नी "कोकणी-मराठी बहिणी बहिणी" म्हणून घोषणा देणाऱ्या ह्याच तरुण म्हालगड्यांनी गोवा पेटवला होता. तेव्हा मराठी महाराष्ट्राची वाटली नाही? नसेल कदाचित कारण फ़क्त कोकणी ह्या एकाच भाषेच्या जोरावर ते आंदोलन चालणे शक्यच नव्हते, आजही नाही. गोव्यातल्या मराठीचं अस्तित्व नाकारणाऱ्या ह्या मनोवृत्तीची कीव करावी तेवढी थोडीच!

कोकणी गोव्याची राज्यभाषा झाली (का गोमंतकीयांवर लादली गेली?) पण स्वत:चं स्थान अढळ करण्यासाठी अजून धडपडत आहे. ह्याचे उदाहरण म्हणजे गोव्याची ’मायभास’ असलेल्या (देवनागरी) कोकणीत आज एकमेव दैनिक सुनापरान्त निघते. त्याचा दर दिवसाचा खप आणि वाचकवर्ग दहा हजारच्या वर नसेल. गोव्याची लोकसंख्या सुमारे पंचवीस लाख आहे. त्याउलट इथे डझनभर मराठी दैनिके निघतात. दैनिक लोकमत हे मराठी वृत्तपत्र (संपादक कोकणीवादी असूनसुध्दा!) गोव्यात येऊन अवघ्या दिड दोन वर्षाच्या कालावधीत गोव्यातले सर्वाधिक खपाचे दैनिक बनले. ज्या दैनिक हेराल्डने कोकणी मराठी वादाच्या वेळेला कोकणीचे मुखपत्र म्हणून कामगिरी बजावली त्या माध्यम समूहालासुध्दा मराठीच वृत्तपत्र काढावे लागले. 


माझा कोकणीप्रती दुस्वास नाही पण मी एवढेच सांगू इच्छितो कि गोव्यात अनादी काळापासून नांदत आलेली मराठी हि काही महारष्ट्राहून निर्यात केलेली नाही. इथल्या मातीतच ति रुजून वर आलेली आहे. मागे कधीतरी एक विधान ऎकिवात आले होते कि गोव्यात मराठीला राज्यभाषा दर्जा दिल्याने महारष्ट्रातील लोक गोमंतकीयांच्या नोकऱ्या बळकावतील. त्यात तथ्यही असेल कदाचित पण म्हणून मंगळूर किंवा केरळवरुन कोकणी भाषिक गोव्यात येऊन इथल्या लोकांच्या नोकऱ्या बळकावण्याची शक्यता कुठल्याही कोकणीवाल्यांना दिसली नाही ह्याचेच आश्चर्य वाटते. 

असो! भाषावादापासून मी सुरुवातीपासून दुरच राहणे पसंत केले. आमच्यावर मराठी संस्कार झाले तरी कधी कोकणीला नावे ठेवायला शिकवले नाही. पण लोक जेव्हा आपले असे अज्ञान दाखवतात तेव्हा मात्र राहवत नाही. वास्तविकत: गोव्याची राज्यभाषा मराठी होणार नाही हि काळ्या दगडावरची रेघ आहे. पण म्हणून गोव्यातल्या मराठीचे अस्तित्व मिटून जाईल ह्या भ्रमात कोणीही राहू नये. गेल्या पन्नास वर्षात हरतरेचे प्रयत्न करुन कोणाच्याही तीर्थरुपांना ते अजून शक्य झालेले नाही. इथल्या गावागावात फ़लक मराठीत लागलेले असतात. लग्नसमारंभांची निमंत्रणे मराठीतूनच छापली जातात. डझनभर वर्तमानपत्रांची भाषा मराठीच आहे. देवळात भजन आरत्या मराठीतच केल्या जातात. गोमंतकियांचं आणि मराठीचं हे दैनंदिन नातं आहे. 

त्यामुळे मराठी राज्यभाषा झाली काय न झाली काय तिच्या अस्तित्वाला तडा जाणं शक्य नाही. अस्तित्व टिकवण्याची धडपड हि कोकणीलाच करावी लागत आहे. माध्यमप्रश्नी आंदोलनाच्यावेळी हे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कितीही टिंगल उडवली म्हणून मराठीला गोव्यात मरण नाही. कारण कोकणी जरी राज्यभाषा बनून घटनेच्या आठव्या परिशिष्टात गेली असली तरी शंभर टक्के गोमंतकीयांच्या काळजात गेली नाही हे कोकणीवाल्यांचे मोठे शल्य आहे. मराठीविषयीच्या त्यांच्या आकसाचे हे एक मोठे कारण आहे.


Monday, November 5, 2012

माणसे

घेतल्या श्वासांपुरती इथे जगतात माणसे
हल्ली फ़ारच विचित्र वागतात माणसे

मी तिऱ्हाईताप्रमाणे बघत राहतो रांगा
कुठल्या मृगजळामागे धावतात माणसे?

सगळे चेहरे आता सारखेच वाटू लागले
कारकुनी मुखवटे रोज चढवतात माणसे

देवळाबाहेरच्या आंधळ्याकडे कोणी बघत नाही
देवळाआतल्या बहिऱ्याकडे गाऱ्हाणी घालतात माणसे

Thursday, November 1, 2012

उत्तर

प्रिय अमुक तमुक
मागे एका लांबलचक कवितेत
तू विचारलं होतंस माझी आठवण येते का इत्यादी वगैरे
उत्तर द्यायला मी काही कविता लिहीणार नाही
तुझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर खरं मलाही माहित नाही
तुझं नक्की कधी विस्मरण झालं ते आता आठवत आहे
सोबत ह्या पत्राच्या एक उशी पाठवत आहे
बहुतेक ह्या उशीत साठल्या आहेत तुझ्या आठवणी
ती जरा पिळून बघ निघतंय का खारट पाणी
त्या खाऱ्या पाण्याला तुझ्या आठवणीचं अत्तर आहे
त्या उशीतच गोठलेलं तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे

Monday, October 8, 2012

भीती वाटते हल्ली...


भीती वाटते हल्ली...
भीती वाटते जगण्याची आणि मरण येईल ह्याची
भीती वाटते आरशात स्वत:ला रोखून बघायची
भीती वाटते स्वत:ला सतत सिध्द करत राहण्याची
भीती गर्दीची, भीती एकटेपणाची
भीती वाटते रस्ता ओलांडताना, सिग्नलवर ब्रेक लावताना
भीती वाटते एटीएम आणि खिशातून पैसे काढताना
भीती वाटते देवाची, भीती उपवास तुटण्याची
भीती आजाराची, डॉक्टरांची, इंजेक्शन घेण्याची
भीती वाटते पुतळ्यात चिणून मारलेले महात्मे
परत जन्म घेतील आणि मांडतील नवे विचार
भीतीच वाटते नव्या विचारांची...
भीती वाटते कुणीतरी बसेल उपोषणाला
आणि बदलून टाकेल आपलं राजकिय आणि सामाजिक चित्र
भीती वाटते बदलाची...
भीती वाटते प्रश्न विचारायची, उत्तर द्यायची
भीती त्सुनामी,  भूकंप, वादळाची
भीती दंग्याची, हल्ल्याची, बॉम्बस्फ़ोटाची

भीती पसरत चाललीय
भीती सवय बनत चाललीय
निर्भीडपणे जगण्याची भीतीच वाटते हल्ली!

Sunday, September 16, 2012

गेली एकवीस वर्ष...एक अस्वस्थ अनुभव


स्थळ: भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ
वेळ: रात्रीचे साडेनऊ
नाटक: गेली एकवीस वर्ष

एवढ्या रात्री एका प्रायोगिक नाटकाला होणारी गर्दी पाहून ऒशाळलेला मी. थिएटरमध्ये शिरताच दिसतो सताड उघडा रंगमंच. कोपऱ्यात दोन कलाकार बॉब डिलनची गाणी म्हणत बसलेले आहे.

How many roads must a man walk down
Before you call him a man?
The answer my friend, is blowin in the wind

खरं तर ‘blowin in the wind’  हे गाणं ह्या नाटकाची नांदीच आहे. तिसरी घंटा झाल्यावर एक तरुण रंगमंचावरुन गाणाऱ्यांना हुसकावून लावतो आणि नाटक सुरू होतं. गोष्ट आहे एका तरुणाची आणि त्याच्या गेल्या एकवीस वर्षाच्या प्रवासाची. स्वत:ला कुठल्याच सामाजिक पार्श्वभूमीवर identify करु शकणारा हा तरुण. इतर समवयीन तरुणांचे जे प्रश्न ते त्यालाही पडतात. पण इतरांसारखा तो त्याकडे दुर्लक्ष करत नाही तर उत्तरं शोधण्याच्या फ़ंदात पडतो आणि त्याचा जो वैचारिक गोंधळ सुरु होतो, तो गोंधळ, ती "को अहम?" स्वरुपी प्रश्नाच्या उत्तरांची शोधयात्रा म्हणजे हे नाटक.
ह्या शोधयात्रेच्या एका वळणावर तरुणला भेटतो रघू. रघू हा केवळ रोडीजचा जज्ज नाही तर तरुणच्या मनातला एक आदर्श पुरुष आहे. त्याला सगळं कळतं असा तरुणचा समज असतो. अर्जुनाला पडलेले प्रश्नांची  उत्तरे जशी कृष्णाने दिली तसंच तरुणला पडलेले प्रश्नांची उत्तरं तो रघूकडून मिळविण्याचा प्रयत्न. पण रघूचं उत्तर गीतेच्या सारासारखं "जो हुआ वो अच्छा हुआ" असं नाही तर "जो हुआ है उसे जला दो" असं आहे. पोर्नची हिस्ट्री डिलीट करावी तशी मनात साचलेली सगळी हिस्ट्री डिलीट केल्याने हे आतून उमटणारे प्रश्न, ह्या वेदना थांबतील हा रघूचा सल्ला तरुण ऎकतो


इतिहास आपल्याला धर्म शिकवतो, शोषण शिकवतो मग त्या इतिहासाला एवढं का जपावं? का त्याच्या संवर्धनासाठी झगडावं? हे प्रश्न धर्मकिर्ती सुमंतने नाटकातून मांडलेले आहेत.
नाटकाची उत्तम बांधणी आणि प्रेक्षकांना वेळोवेळी सामावून घेणारे सादरीकरण ह्या नाटकाच्या जमेच्या बाजू आहेत. दिगदर्शक आलोक राजवाडेने ज्या फ़ॉर्मद्वारे हे नाटक हाताळलंय, त्यानुसार तर नाटकपाथब्रेकिंग म्हणावं लागेल. कुठेही क्लिष्टता नाही, गिमिक्स नाही, अचूकपणे घेतलेल्या जागा तर म्हणजे लै भारीच!
नाटकातील मध्यवर्ती भूमिका अमेय वाघने साकारली आहे. तो कहर करतो. त्याच्यात प्रचंड एनर्जी आहे आणि हे वेळोवेळी त्याने साकारलेल्या भूमिकेतून जाणवत राहतं. सिध्दार्थ मेननने रघूची भूमिका तितक्याच ताकदीने साकारली आहे. ’नाटक कंपनीच्या कुठल्याही नाटकाचा यूसपी म्हणजे उर्जेने भरलेले कलाकार आणि तेवढाच तगडं सादरीकरण. ’गेली एकवीस..’ हेही नाटक त्याला अपवाद नाही.

नाटक बघता बघता मला माझी नुकतीच गेलेली एकवीस वर्ष आठवली. गोंधळून जायचो मीही गांधीवादी मुद्द्यावर भांडताना, मित्रदबंगबघायचे तर मी आयन रॅण्ड वाचायचो, आणि असे अनेक प्रश्न आणि अनेक तफ़ावती! धर्मकिर्तीने तो गोंधळ मनात परत जिवंत केला. मन अस्वस्थ झालं. दडपून टाकलेले प्रश्न परत उभे राहिले, अनामिक भितीपोटी मारुन टाकलेल्या इच्छा पुन्हा जाग्या झाल्या. खूप विचित्र आणि अस्वस्थ वाटतंय. कळ येणं म्हणजे नक्की हेच का?