Saturday, April 29, 2017

कटप्पाने बाहुबलीला का मारलं?

कैक दिवसांनी मला
एकाच प्रश्नाने घेरलं
कटप्पाने बाहुबलीला
का म्हणून मारलं?

हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे
देशाचं सार्वभौमत्व धोक्यात आहे
प्रश्नाची उकल झालीच पाहिजे
कटप्पाने असं का केलं
हे कळलंच पाहिजे
इतर प्रश्न तर रोज़च असतात
पण हे प्रकरण आहे खास
कटप्पाची इंटेन्ट कळेपर्यंत
सोडायचा नाही ध्यास
एरव्ही कोणी मारले कुणाला
आपल्याला काय घेणं
पण बाहुबलीच्या बापाचं
लागतो आपण देणं
म्हणून काळजी रास्त आहे
पर्सनल स्टेक जास्त आहे
देशभरात लोक सगळे
एकाच प्रश्नाने त्रस्त आहेत
काय झालं असेल त्यांच्यात
असं कसं घडलं?
कळलं का हो तुम्हाला,
कटप्पाने बाहुबलीला का मारलं?

थ्रीडी व्हीआर व्हीएफएक्स
हेच खरं आहे
बाहेरच्या बोरिंग रियॅलिटीपेक्षा
तेच बरं आहे
शेतकऱ्यांनी आत्महत्या करुदेत
अखलाक, पेहलू खान मरताहेत, मरुदेत
त्यांचे खून पाडले म्हणून
आपण रडायचं नाही
बाहुबलीच्या खुनाचं कुतूहल
आपण सोडायचं नाही
कुठल्या कटप्पाने आपल्यातल्या
संवेदनशीलतेला मारलं
आपल्यातला माणुसकीला आपण
कुठे नेऊन पुरलं?

ते जाऊद्यात
मला सांगा
कटप्पाने बाहुबलीला का मारलं?

No comments: